मनोरुग्णांचा अतिश !

! मनोरुग्णांचा अतिश !

माणसासारखी माणसं ही

आभाळाचं पांघरून आणि जमिनीची अंथरूण करून झोपणारी,


आयुष्याचे अवकाश त्यांचे कोरेे

ना कोणताच रंग, नसतील तारे,


नाकारले समाजाने,आपल्यांनीही हेटाळले

सुंदर आयुष्याचे प्रस्ताव देवानेही फेटाळले,


एक जिद्दी अतिश टक्कर देऊन उभा आहे

त्यांच्या हरवलेल्या अवकाशात स्वप्नाचे तारे जोडत आहे,


कर्म त्याचे सिद्ध आहे त्यांच्या वेदनांवर मलम म्हणून,

या आमच्या साथीला करतो आम्ही सलाम म्हणून..!

– विनायक

स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत आपण सगळेच धावत असतो पण ज्यांची स्वप्नेच काय पण आयुष्य पण विस्कटलेली आहेत अशा मनोरुग्णांच्या उभारणी साठी तरुणपणातील महत्वाची वर्षे वेचणाऱ्या अतिश ची कहाणी फक्त तरुणांनाच न्हवे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे,

मानसिक रुग्ण या अतिशय दुर्लक्षित समाजघटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशची कहाणी वाचून नक्कीच बदलला पाहिजे, मदतीचे अनेक हात या कामी पुढे आले पाहिजेत, इतर मागास समाज घटकांसाठी किंवा अपंगांसाठी वेगवेगळ्या सरकारी मदत योजना असतात पण मानसिक रुग्ण मात्र केवळ सहनुभूतीचे धनी असतात, त्यांना उभं करण्यासाठी अतिश सारखे तरुण झटत आहेत हे पाहून खरंच खूप प्रेरणा मिळते, अतिश च्या या कामासाठी केवळ छान किंवा अभिनंदन म्हणता येणार नाही कारण हे त्याचाही पेक्षा कितीतरी अधिक किंमती व मोलाचे काम आहे.

‘आम्ही मदतीचा हात देऊ शकू’ आपले हे विधान सुद्धा या कामाला अजून पुढे घेऊन जाईल.

Proud of you brother 

– विनायक शालन महादेव

– 7588167721

– envinayak@gmail.com

(पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

मनोरुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ज्यांना कोणी नाही, त्यांचा तर कोणी वाली नाहीच; पण ज्यांना पालक आहेत, त्यांचंही पालकांनंतर कोण अशी भीषण परिस्थिती सध्या आहे. सोलापूरचा अतिश कविता लक्ष्मण हा तरुण मात्र या मनोरुग्णांकडे या दृष्टीनं पाहत नाही. त्याच्यातली सेवाभावी वृत्ती, त्याच्यातलं जिवंत असलेलं माणूसपण त्याच्यातला बंधुभाव मरू देत नाही. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज अतिशच्या कार्याबद्दल…सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांचा

विशेष लेख वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर… 

http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5224472482128872074

हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती

सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी

गुरू ठाकूर याच्या या ओळी गेले काही दिवस मनात ठाण मांडून बसल्या आहेत. लिहिणारा लिहून जातो; पण त्याच ओळी कोणाचं तरी आयुष्य बनतात. ज्यांचं आभाळ हरवलंय, ज्यांना वाट कळतच नाहीये, अशांचा सारथी होणारा एक तरुण मला भेटला आणि त्याचं काम, त्याची सेवाभावी वृत्ती पाहून मी थक्क झाले. या तरुणाचं नाव अतिश कविता लक्ष्मण! 

अतिश सोलापूरमध्ये राहणारा, राज्यशास्त्र विषय घेऊन बीए झालेला एक साधा मध्यमवर्गीय तरुण! सध्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अतिशला लिहायला आणि वाचायला आवडतं. दया पवार यांचं ‘बलुतं’ हे आत्मचरित्र त्याचं आवडतं पुस्तक! तो मनोरुग्णांसाठी काम करतो आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण आधी मनोरुग्णाबद्दल थोडं बोलू या. 

२०११ साली भारतात मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.७ टक्के इतकी होती. काही तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण तीन टक्के इतकं आहे. खरं तर आज मेंटली चॅलेंज्ड किंवा न्यूरॉलॉजिकल डिसॅबिलिटी सात ते आठ कॅटॅगरीजमध्ये विभागल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ० ते १८ वयोगटातली एकूण लोकसंख्येच्या १० टक्के मुलं मेंटल डिसऑर्डरची शिकार आहेत आणि हे चित्र खूपच विदारक आणि धक्कादायक आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार २०२० सालापर्यंत मानसिक विकारानं ग्रस्त असलेल्यांचं आकडेवारीचं वाढतं प्रमाण जवळजवळ लोकसंख्येच्या २० टक्के होण्याची भीती व्यक्त केली जातेय. याच्या मागे बदलती समाजव्यवस्था, चंगळवाद, विषमता, सोशल मीडियाचा अतिरेकी शिरकाव, नातेसंबंधांतला दुरावा, प्रदूषण, बेकारी, ताणतणाव, स्पर्धा अशी अनेक कारणं आहेत. 

आज जेव्हा घराच्या बाहेर आपण पडतो, तेव्हा सिग्नलच्या ठिकाणी, चौकात किंवा फूटपाथवरच्या कचऱ्यात एखादा वेडसर वाटणारा पुरुष किंवा स्त्री आपल्याला दिसते. कपडे अत्यंत मळलेले आणि अस्ताव्यस्त, केसांच्या जटा झालेल्या, चेहऱ्यावर वेडसर भाव….त्यांना जवळ येताना पाहून आपल्या मनात भीतीची आणि तिरस्काराची भावना तयार होते…..ते आपल्यावर हल्ला करतील का, अशीही भीती वाटते. ही मंडळी मनोरुग्ण म्हणण्यापेक्षा आपण ‘वेडी’ म्हणून त्यांच्यावर शिक्का मारतो आणि दुर्लक्ष करतो. आज अशा लोकांसाठी कुठलीही ठोस व्यवस्था सरकारनंही केलेली दिसत नाही. वेडसर लोकांसाठी आपल्या ज्ञानाप्रमाणे पुण्यातलं येरवडा मेंटल हॉस्पिटल आहे हे खरं; पण अशा हॉस्पिटल्सची संख्या तरी किती आहे? इथं किती लोकांना प्रवेश मिळू शकतो? कदाचित माझ्या नातेवाईकाला किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला मी इथं दाखल करू शकेन; पण जे रस्त्यावरून हातवारे करत फिरताहेत, अंगावरच्या कपड्यांचं आणि जखमांचं ज्यांना भान नाही, अशांना कुठे थारा आहे? त्यांच्यासाठीचं आश्रयाचं ठिकाण कुठलं आहे? अशा रुग्णांचं सामाजिक उत्तरदायित्व सरकारनं घ्यावं आणि त्यांना कायमचा निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रस्त पालकांनी, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांनी सरकारकडे केली आहे. कारण अशा रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ज्यांना कोणी नाही, त्यांचा तर कोणी वाली नाहीच; पण ज्यांना पालक आहेत, त्यांचंही पालकांनंतर कोण अशी भीषण परिस्थिती सध्या आहे. 

अतिश कविता लक्ष्मण हा तरुण मात्र या मनोरुग्णांकडे या दृष्टीनं पाहत नाही. त्याच्यातली सेवाभावी वृत्ती, त्याच्यातलं जिवंत असलेलं माणूसपण त्याच्यातला बंधुभाव मरू देत नाही. लहानपणापासून अतिशला सामाजिक कार्याची आवड होतीच. शाळा, कॉलेजमध्ये असतानाही तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सतत भाग घ्यायचा. अनेक तृतीयपंथी त्याचे मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांच्या व्यथा आणि वेदना तो समजावून घेत असतो.

अतिश एके दिवशी सिद्धेश्वचर मंदिराच्या परिसरात असताना त्याला तिथं एक तरुणी दिसली. ती एकटीच बसलेली होती. कोणी काही दिलं तरी ती खात-पीत नव्हती. तिथे बसलेल्या इतर गरिबांना पैसे किंवा खाण्याचे पदार्थ दिले, की ते पटकन हात पसरून घेत; पण ही त्यांच्यापेक्षा वेगळी होती. तिच्याबद्दल अतिशच्या मनात कुतूहल निर्माण झालं. तो रोजच जाऊन तिच्यावर लक्ष ठेवू लागला. तिचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं सगळं न्याहाळू लागला. तिच्यासाठी तो वडा-पाव घेऊन जाई; पण ती त्या वडा-पावला हातही लावायची नाही. एके दिवशी अतिशनं वरण-भात नेला आणि तिच्याशेजारी बसून स्वतःही खायला सुरुवात केली. या त्याच्या वागण्यानं तिला काय वाटलं कोणास ठाऊक; पण तिनंही तो वरणभात खायला सुरुवात केली. अतिश तिच्याशी बोलू लागला. सुरुवातीला ती गप्प असायची; पण नंतर ती त्याच्याशी कधी कन्नड, तर कधी हिंदी भाषेत बोलायला लागली.  असेच दोन-तीन महिने गेले आणि ती त्याच्याशी मराठीतूनही बोलू लागली. अतिशनं एका वारकरी मावशींना मदतीला घेतलं आणि तिच्यासाठी चांगले स्वच्छ कपडे आणले आणि तिला स्वच्छ करून ते घालायला भाग पाडलं. तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. ते केस नीट कापले. आता तिचं काय करायचं हा प्रश्ना अतिशसमोर उभा राहिला. खाऊ-पिऊ घालणं, बोलणं इथपर्यंत ठीक होतं; पण पुढे काय?

अतिशनं तिच्यासाठी तिथल्याच सरकारी इस्पितळात विचारणा केली; पण हाती निराशाच आली. मग अतिशनं गुगल सर्च करून अशा रुग्णांसाठी कुठल्या संस्था आहेत का, याची पाहणी सुरू केली; पण तिथूनही काही माहिती हाती लागली नाही. अतिशनं या महिलेसारखीच १०-१२ मनोरुग्णांची सेवाशुश्रुषा केली होती; पण त्यांचं पुढे काय करायचं हे त्याला कळत नव्हतं. प्रयत्न करणाऱ्या माणसाला मार्ग सापडतोच सापडतो. तसंच अतिशचं झालं. अतिशनं फेसबुकवर अशा मनोरुग्णांविषयी पोस्ट टाकली आणि असं काम करणाऱ्यांविषयी विचारणा केली. अतिशची पोस्ट फळाला आली. कोल्हापूरच्या अमित प्रभा वसंत यांनी फेसबुकवरून अतिशशी संपर्क साधला. दोघांची भेटही झाली. अमित यांची ‘माणुसकी फाउंडेशन’ नावाची मनोरुग्णांसाठी काम करणारी संस्था कोल्हापूरमध्ये आहे. त्यांनी अतिशला अनेक मनोरुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात याची माहिती दिली. कर्जतला ‘श्रद्धा फाउंडेशन’ नावाची संस्था मनोरुग्णांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशनं लगेचच उत्साहानं या महिलेविषयी कर्जतच्या संस्थेशी संपर्क साधून सगळी माहिती कळवली. आम्ही तिला आमच्या संस्थेत दाखल करायला अमुक एका दिवशी सोलापूरमध्ये येतोय, असं त्याला कळवण्यात आलं. अतिशसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती. ‘श्रद्धा फाउंडेशन’ही अशा रुग्णांसाठी मोफत काम करते हे विशेष. त्यासाठी ती कुठलंही शुल्क आकारत नाही. अतिशनं त्यानंतरही आठ मनोरुग्ण तिथं पाठवले आणि तीन-तीन महिन्यांच्या अवधीत ते सगळेच पूर्णपणे बरे झाले.

अतिशनं कर्जतच्या श्रद्धा फाउंडेशनमध्ये ज्या महिलेला पाठवलं, ती बरी झाली. ती कर्नाटकातल्या विजापूरमधल्या एका छोट्याशा गावातली रहिवासी होती. सात वर्षांपासून ती घराबाहेर होती. तिच्या घरच्यांनी तिला घरात घेतलं. बार्शीची एका महिला २२ वर्षं घराबाहेर होती. तिला घेऊन तिच्या घरी गेल्यावर तिच्या मुलानं मात्र तिला घरात आसरा देण्याचं चक्क नाकारलं. मग महिला सुधारगृह हा एकच पर्याय अतिशसमोर होता. त्यानं तिथले दरवाजे ठोठावले. अथक प्रयत्नांनी तिला तिथे दाखल करून घेण्यात आलं. तिचं सुदैव असं, की काहीच दिवसांत तिच्या दूरच्या नातेवाईकांना तिच्याविषयी माहिती कळली आणि ते तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. 

अतिशला भेटणाऱ्या मनोरुग्णांपैकी कोणी कचराकुंडीत बसलेलं आढळतं, कोणी नग्नावस्थेत, तर कोणी कपडे फाडताना, तर कोणी शिव्या देत दगड फेकून मारताना! केसांच्या झालेल्या जटा, अंगावर धुळीची जमलेली पुटं, अंगाला झालेल्या अगणित जखमा आणि त्यातल्या अळ्या, अन्न दिलंच तर ते मातीत कालवून खायची सवय ही सगळी दृश्यं पाहून अतिशचं मन गलबलून जायचं आणि जातं. त्यांच्याशी सतत बोलणं, भेटणं, त्यांना स्वच्छ करणं, त्यांचे केस कापणं, त्यांना आपल्या घरातून कपडे आणून घालणं, त्यांना खाऊ-पिऊ घालणं हे तर तो आजतागायत करतोच आहे; पण त्यांच्याशी कसं वागावं, त्यांच्याविषयी कसं जाणून घ्यावं असे अनेक प्रश्न  अतिशच्या मनात निर्माण होऊ लागले. अशा वेळी अतिशला अमित प्रभा वसंत यांनी अच्युत गोडबोले या प्रख्यात लेखकाचं मानसशास्त्रावरचं ‘मनात’ हे पुस्तक वाचायला सांगितलं. खरं तर काही वर्षांपूर्वी अतिशनं हे पुस्तक विकतही घेतलं होतं; पण वाचलं नव्हतं. अतिशनं ‘मनात’ आणलं आणि वाचलं. अनेक प्रश्नांसची उत्तरं त्याला या पुस्तकात मिळाली. अनेक गोष्टी तो या कामातून शिकतो आहे. मनोरुग्ण पैसे मागत नाहीत. शक्यतो ते वरणभात खातात. अतिशने भेटलेल्या मनोरुग्णांची कृष्णा, ओशो, नागोबा अशी नावं स्वतःच ठेवली आहेत. कारण ते आपलं नावही सांगू शकत नाहीत. तसंच त्यांना समजो की न समजो, पण आपल्या सोबतच्या मित्रांशीदेखील अतिश त्यांचीओळख करून देतो. बहुतेक लोक भिकारी किंवा वेडा समजून अशा रुग्णांपुढे खाण्याचे पदार्थ टाकतात; पण पाणी कोणी देत नाही. अतिश रोज रात्री फेरी मारताना खाण्याच्या डब्याबरोबर आवर्जून पाण्याची बाटलीही बरोबर घेतो.

अतिशचं मागच्या वर्षी लग्न झालं आणि त्यालाही त्याच्यासारखीच जोडीदार लाभली. त्याची पत्नी एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. अतिशच्या कामात त्याचं आख्खं घर सहभाग घेतं. रोज आठ ते १० मनोरुग्णांसाठीचा स्वयंपाक घरातल्यांबरोबरच बनतो. अशा लोकांसाठी त्याची आई आणि पत्नी १० डबे तयार करून ठेवतात. अतिश हे डबे घेऊन त्या त्या ठिकाणी (उकिरडा, रेल्वे स्टेशन, चौक, इस्पितळाच्या बाहेरचा परिसर, बसस्टँड अशा जागी) जाऊन मनोरुग्णांना शोधतो आणि त्यांना त्यांच्यासोबत बसून जेवू घालतो. त्याचे काही मित्रही त्याला या कामात साहाय्य करतात. अतिश अशा रुग्णांशी गप्पा मारतो. ते असंबद्ध बोलत राहतात; पण त्यांना अतिश आपल्या जवळचा आहे हे मात्र कळतं. आज अतिशच्या प्रयत्नांमुळे बहुतांशी मनोरुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत; मात्र बरे झाल्यानंतर त्यांना मधल्या काळाचं विस्मरण झालंय. त्या काळात अतिशची भेट, त्याची मदत त्यांच्या लक्षात राहत नाही. ते अतिशला ओळखतही नाहीत; पण अतिशला मात्र त्यांचं घर, त्यांचे लोक आणि त्यांचं सर्वसामान्यांप्रमाणे जगणं हे पाहूनच आनंद मिळतो. आपलं हे काम आपल्याला खूप काही शिकवतंय, आपल्याला समृद्ध करतंय आणि आपल्याला समाधानही देतंय असं अतिश म्हणतो.

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधले सगळेच कर्मचारी अतिशला ओळखू लागलेत. तेही त्याला साहाय्य करतात. अॅम्ब्युलन्सदेखील अनेक वेळा उपलब्ध करून दिली जाते. काही मनोरुग्णांचे नातेवाईक शोध घेऊनही सापडत नाहीत किंवा सापडलेच तर ते अशा रुग्णांना घरात घ्यायला ते नकार देतात आणि ज्यांच्यामुळे, ज्या वातावरणामुळे ही माणसं मनोरुग्ण झाली त्यांच्याकडे किंवा त्याच वातावरणामध्ये त्यांना पाठवणं अतिशलाही नको वाटतं. आपल्या सरकारी यंत्रणेकडूनही अशा रुग्णांसाठी कुठली व्यवस्था नाही. अशा वेळी आपण काय करू शकतो याचा तो सातत्यानं विचार करत असतो. त्याच्या मनात ‘संभव’ नावाची संस्था स्थापन करून अशा मनोरुग्णांसाठी हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतिशचे प्रयत्न आणि धडपड सुरू आहे. अतिशला त्याच्या या कामात मदत करण्यासाठी त्याच्याशी जरूर संपर्क साधावा. 

अतिश जे करतोय, तो त्याच्या जगण्याचा एक भाग बनला आहे. माणसाची इतरांप्रति संवेदना, प्रेम आणि करुणा असण्यासाठी गुरू ठाकूरच्या ओळी आपल्याही जगण्याचा भाग बनल्या पाहिजेत. अतिशनं त्या त्याच्या अंगी रुजवल्या, आपण कधी?

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा रंध्रातुनि संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या, खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे….

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे……

संपर्क :

अतिश कविता लक्ष्मण 

मोबाइल : ९७६५० ६५०९८

ई-मेल : atishirsat@gmail.com

– दीपा देशमुख

मोबाइल :९५४५५ ५५५४०

ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com
(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

Comment 

विनायक शालन महादेव

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s