जवाब दो…!

आज गौरी लंकेश यांचा झालेला खून हा एका खुनाच्या सत्रातील एक भाग आहे, गेल्या काही वर्षांपासून असहिष्णुता वाढत आहेआणि ते दिवसेंदिवस उग्र रूपधारणकरीत आहे, अजून असे किती बळी पडू द्यायचे आपण ? याचा जाब विचारणार आहोत की नाही आणि त्याची उत्तरे सरकार देणार आहे की नाही ?

हो..! ; आज उत्तरं द्यावीच लागतील..! पण फक्त मुठभर लोकांनीच “जवाब दो..!” म्हणून जाब विचारून भागणार नाहीये तर याला मोठ्या प्रमाणावर लोकांनी जाब विचारला पाहिजे कारण हा प्रश्न आपल्या सामाजिक सुधारणेच्या एका महत्वाच्या टप्प्यावरचा आहे, काही बुद्धिभ्रष्ट जमात नीच स्वार्थासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरून विषमतेचे विष कालवत आहे, अनेक लोक; खासकरून तरुण यात ओढले आणि फरफटले जात आहेत, त्यांना बुद्धिभ्रष्ट करण्याची एकही संधी हे कट्टरवादी सोडत नाहीयेत, आणि आपण काय करतोय, तर आपली जबाबदारी झटकून या कडे सहज दुर्लक्ष करतोय, पुराचे पाणी चौकटीला लागल्याशिवाय घर न सोडणारे आपण याच पुरात बुडून मरणार आहोत. पण आपल्याला बऱ्याच वेळा हे दिसत नाही, कधी कधी डोळ्यासमोर असणारे सत्य सुद्धा आपणास दिसत नाहीत कारण सत्य आणि तथ्य दिसण्यासाठी फक्त डोळे उघडे असण्यापेक्षा तसा दृष्टीकोन असणे पण महत्वाचे असते, आणि दुर्दैवाने आपण आपला सद्सद्विवेक दृष्टीकोन अजून विकसित करू शकलो नाही. हे सत्य आहे की नाही कुणास ठाऊक ? की जगातले सर्वात उत्तम गुलाम भारतात राहतात ? आणि म्हणूनच की काय तुर्क इराणी मोगलांपासून ते सातासमुद्रापल्याड हून आलेल्या इंग्रजांनी आपल्याला कित्येक वर्षे गुलामगिरीत ठेवले. गोरे इंग्रज तर गेले पण आज काळे इंग्रज लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही तर झुंडशाही व सामुहिक दादागिरीच्या जोरावर गुलामगिरी राबवत आहेत.

अभिव्यक्ती स्वतंत्राचा तर गळा चिरला जातोय तर विचार आणि भाषण स्वातंत्र्याला दिवसा ढवळ्या गोळ्या घातल्या जातायत, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या सारखे सुधारणावादी पुरोगामी मारले जात असताना यांची हत्या करणारे मात्र मोकळे फिरत आहेत आणि या क्रूर अन्यायाचे आपण फक्त दर्शक आहोत, आणि थंड आहोत. जंगली श्वापदांना काय म्हणून घाबरायचे ? इथे तर माणूसच नरभक्षक झालाय. इथे माणूस मेलाय, इथे निर्दोष मेलाय, इथे न्याय मेलाय.

तथाकथित धर्मगुरूंच्या मते गो-हत्या पाप आहे पण धर्माच्या नावाखाली माणसांच्या कत्तली करवून आणणारे पण हेच आहेत तेव्हा हा कसला विरोधभास म्हणायचा, माणसाच्या जीवापेक्षा गाईच्या जीवाला महत्व प्राप्त झाले आणि गो-रक्षनार्थ नरबळी घेणाऱ्याला शिक्षेच्या ऐवजी धर्मवीर,गोरक्षक या पदांची प्राप्ती होत आहे. कारण इथे रस्त्यावर पडलेले मुडदे आक्रोश करताहेत पण कोर्टात जबाब देणारे गांगरून दातखिळी बसल्यासारखे थंड आहेत, सनातनवाद्यांकडून धर्माच्या नावाखाली निर्दोष मारले जात असताना सरकार अळीमिळी गुपचिळी आहे जणू यांची वाचा बसली असावी.

सांप्रदायिक दंगली मध्ये जाळपोळ, हिंसा, सामुहिक अत्याचार हे चित्र जणू सवयीचे बनले आहे, या तापलेल्या वातावरणात आपली राजकीय पोळी भाजून घेणे हे कौशल्य यांना आता चांगलेच अवगत झाले आहे आणि त्याला खत पाणी म्हणून मग नागरिकांच्या जीवाचा जुगार लावून वोट बँकेचे राजकारण कसे करावे या साठी संघ ‘स्कील डेवलपमेंट’ ची शिबिरे भरवत आहे. सगळेच पक्ष सत्तेसाठी हा जुगार खेळण्यास सज्ज आहेत. यात आजचा गोंधलेला भांबावलेला युवक भरडला जात आहे आणि तो कट्टरपंथीयांच्या जाळ्यात ओढला जात आहे. मंदिर मस्जिद यांचे घाणेरडे राजकारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाझरत आहे आणि हे भयावह आहे, जर देवाला, अल्लाह ला आपल्या मनातच जागा नसेल तेव्हा मग या मंदिर, मस्जिद असण्याचा फायदा काय ?

अमीर खानच्या वक्तव्यावरून त्याला देशद्रोही ठरवण्याच्या अगोदर कुणीतरी या नेत्यांच्या भाषणावर पण लक्ष द्यावे, विषमतेचे विष हेच जास्त ओकत असतात. त्या अभिनेत्याला त्याच साध मत ही व्यक्त करू दिल जात नाही ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या न्हवे तर मग काय आहे. लेखकांनी साहित्यकारांनी पुरस्कार वापसी केली ते मग काय चुकीचे होते का, जर लिहायचे स्वतंत्र च नसेल तर पुरस्कार काय कामाचा ? इथे कुणी काय बोलायचे आणि कुणी काय लिहायचे हे ठरवणारे नवे राज्यकर्ते तुमच्यावर राज्य करीत आहेत याची जाणीव असुद्या फक्त, “मुह में राम और बगल में छुरी” घेऊन फिरणारे नेते तुम्हाला कधी गुंडाळतील कळणार पण नाही, यांच्या शिक्षणाच्या बनावट डिग्री बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण यांची डिग्रीच न्हवे तर बुद्धी सुद्धा भ्रष्ट आहे.

घरवापसी असो वा लव जिहाद असो हा सगळा “फोडा, झोडा आणि राज्य करा” या एकमेव कारणासाठी देशद्रोही नेत्यांनी देशाच्या नागरिकांच्यासोबत केलेला द्रोह आहे. आणि कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही याचा फैसला हेच नेते करणार. आपण जर आपली देशभक्ती फक्त पाकिस्तानविरुद्ध च्या क्रिकेट सामन्या पुरती दाखवत असू किंवा १५ ऑगस्ट , २६ जानेवारी पुरती हंगामी देशभक्ती दाखवत असू तर मग आपल्यापेक्षा हे नेते बरे म्हणायचे.

अन्यायाविरोधात बोलणारया कन्हैया सारख्या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणून सीडीशन चार्ज लावले जात आहेत, मिडिया तर अर्धवट सत्य दाखवून टीआरपी च्या आमिषाने चोर सोडून संन्याशाला आरोपीच्या पिंजरयात उभे करत आहे. सोयीप्रमाने चित्रफितींची काटछाट करून त्यांना ब्रेकिंग न्यूज केले जात आहे. एखाद्याच्या वक्तव्याचा विपर्यास कसा करावा हे मिडिया कडून शिकावे.

मिडिया ने सरकार ला जाब विचारणे अपेक्षित असताना या मिडिया ला जाब विचारणार कोण ?

अन्यायाचे बळी ठरलेल्याना न्याय देणार कोण ? हे प्रश्न आज ही अनुत्तरीत आहेत.

मला माहिती आहे की आपल्यासारखे सामान्य नागरिक जास्त काही करू शकत नाहीत पण म्हणून शांत बसून अन्याय सहन पण नाही करू शकत ना !

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी आहेत ज्या पैकी ४-५ जन बिघडलेली आहेत आणि ते पूर्ण वर्गाचं वातावरण कलुषित करीत आहेत, कारण अन्य विद्यार्थी त्यांना हे करू देत आहेत ते संख्येने जरी जास्त असले तरी शांत बसून दर्शकाच्या भूमिकेत आहेत, पण त्या ४-५ जणांच्या चुकीची शिक्षा सगळ्या वर्गाला भोगावी लागत आहे. अगदी तसच आपल्या समाजात सुद्धा वाईट प्रवृत्ती फोफावल्या कारण तुम्ही आम्ही दर्शक बनलो आहोत, सहन करीत आहोत, षंढ पणे थंड आहोत. पण आता थंड बसून चालणार नाहीये पाणी गळ्यापर्यंत याले आहे नाकातोंडात जायला अवकाश लागणार नाही जर तुम्ही जाब विचारला नाही. माझा विश्वास आहे की आपल्या समाजात चांगल्या प्रवृत्तीची माणसे भरपूर आहेत त्यांना बघ्याच्या भूमिकेतून बाहेर पडावेच लागेल, उघडपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावाच लागेल, “जवाब दो..!” म्हणून जाब विचारावाच लागेल.

विनायक साळुंखे
७५८८१६७७२१
envinayak@gmail.com

Advertisements

I stand alone

मनगटावरील गुंडाळलेल्या दोऱ्यापेक्षा मनगटामधील ताकतीवर विश्वास आहे माझा,

गळ्यावर लावलेल्या अंगाऱ्या पेक्षा माझ्या वक्तृत्वावर विश्वास आहे माझा,

कपाळावरील गंध विभूती पेक्षा माझ्या मेंदुवर आणि त्याच्या विचारांवर विश्वास आहे माझा !

विवस्त्र मन..!

तुझं मन आवर,

तिच्या तोकड्या कपड्यापेक्षा ते जास्त उघडं आहे.

तुझं मन आवर,

तिच्या बोलण्यावागण्या पेक्षा ते जास्त विकृत आहे.

तुझं मन आवर,

तिच्या उघड्या मांड्या पेक्षा ते जास्त विवस्त्र आहे .

राज्य कुणाचं ? राजाचं की कायद्याचं ?

पाहतोय ही झुंबड

कायद्याची टिंगल,
दाखवतायत सगळे किती आहेत एकनिष्ठ

पण तरीही कायद्यापेक्षा कोणीही नाही श्रेष्ठ
निर्दोष असाल तर भीती कशाला

अटकेपासून वाचण्यासाठी 

जातीचा आधार कशाला
नागरिक सगळे एका देशाचे

सगळे इथे समान

पक्षाच्या चिंध्या बाजूला ठेवून

तिरंग्याला करा सलाम

लोकप्रतिनिधी आपले राजे नसून

आपल्या सेवेसाठी आपण निवडून दिलेले

आहेत आपले गुलाम
नागरिक आहोत आपण महान भारत देशाचे

स्वतंत्र आहोत आपल्या डोक्याने विचार करण्यासाठी

माणसांसमोर झुकणारी माणसं विकलेली असतात

कायद्यासमोर झुकणारी माणसं शिकलेली असतात
– विनायक

विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती स्वतंत्रता..एक प्रेशर कुकर..!विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती स्वतंत्रता..एक प्रेशर कुकर..!

(धगधगत कॉलेज जीवन; समस्या आणि उपाय)

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.  – रविंद्रनाथ टागोरांची ही कविता शिक्षणव्यवस्थेकडून कसे शिक्षण अपेक्षित असते हे व्यक्त करते

विद्यार्थी परिसंवाद म्हणा अथवा विद्यार्थी परिषद किंवा educational conference म्हणू आज S.M. जोशी फौंडेशन हॉल, पुणे येथे या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी जमले होते, जेष्ठ भाषा संशोधक डॉ गणेश देवी हे निमंत्रित होते तर सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आमंत्रित होतो, विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने आम्ही प्रतिनिधी मयुर खराडे, डॉ अरुण, यशवंत, विजय, प्रज्वल (सर्व सातारा) आणि मी विनायक साळुंखे(कोल्हापूर) तसेच आमचे साथी सुवर्णा ताई, युवक क्रांती दलाचे सुदर्शन चखाले,

आणि आमच्या बरोबर होते; ‘सिंगल मिंगल’ या सध्या तरुणाई मध्ये गाजत असलेल्या पुस्तकाचे चे लेखक श्रीरंजन आवटे सर, पुणे विद्यापीठातील काही प्राध्यापक व संशोधक मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेली इतर विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी..!

आजच्या परिसंवादाचे वैशिष्ठ हे म्हणावे लागेल की आम्ही विद्यार्थी आमंत्रित असलो तरी अध्यक्ष पण आम्हीच होतो

प्रमुख वक्ते पण आम्हीच होतो आणि विचारमंथन करणारे पण आम्हीच होतो.

डॉ गणेश देवी सर आम्हाला बोलकं करत होते, आज जागतिक स्तरावर इस्तंबुल असो किंवा टर्की असो देशातील राजकारणामुळे कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी आणि त्यांची गुदमरलेली स्थिती या वर प्रकाश टाकला गेला आणि त्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठात व बाहेर सुद्धा विद्यार्थ्यांची काय स्तिथी आहे हे जाणून घेण्यासाठी व त्यावर चर्चा, विचारमंथन करून काय उपाय काढता येतील यासाठी आजचा उहापोह होता.

अनेक विद्यार्थ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि कथा आजचं कॉलेज जीवन उलगडून दाखवत होत्या, त्यांची होणारी घुसमट स्पष्ट दिसत होती आणि आज ते मुक्तपणे इथे व्यक्त होत होते , जवळपास 40 पेक्षा जास्त विद्यार्थी आज इथे व्यक्त झाले आणि त्यांनी मांडलेले मुद्दे मी आपल्यासमोर संक्षिप्त रुपात मांडतोय,

‘आज भारतीय विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत घुसमटला जातोय का ?, त्याचे अभिव्यक्ती स्वतंत्र तो मुक्तपणे उपभोगू शकतोय का? कोणता दबाब, कोणती भीती त्याची घुसमट होण्यास कारणीभूत आहे ?’

शिक्षणव्यवस्थेचे वास्तव लक्षात घेता, बदलणाऱ्या काळानुसार न बदलल्या मुळे ते पारंपरिक बनले आहे

त्यात विद्यार्थ्यांना स्वतःला ऍडजस्ट करून बसवावे लागत आहे,

कृत्रिम शिक्षण व्यवस्था त्यांना कृत्रिम बनवत आहे इथे एक न दिसणारी लढाई सुरू आहे नैसर्गिक माणूस आणि कृत्रिम शिक्षण अशी ही लढाई आहे,

नैसर्गिक मानवी क्षमता अधिकाधिक विकसित करणं, कल्पनाशक्तीला चालना व खाद्य देऊन मानवी प्रतिभांच्या माध्यमातून व्यक्त होण्यास साधन उपलब्ध करून देणं, त्या प्रतिभा अजून खुलवनं, मुक्तपणे विचार करणारा समाजशील प्राणी बनवणं हे व्यक्तीकेंद्री शिक्षण आजच्या शिक्षणव्यवस्थेकडून अपेक्षित असताना

सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना गृहीत धरून चालली आहे

शिक्षण व्यवस्थेला अपेक्षित असलेला so called ‘आदर्श विद्यार्थी’ कसा आहे ? त्याने शिक्षक सांगतील ते सर्व निमूटपणे ऐकले पाहिजे, अजिबात प्रश्न नाही केला पाहिजे, फक्त जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील याचा विचार केला पाहीजे, राजकारणाबद्दल त्याची कोणतीही मते असता कामा नयेत, स्वतःची critical thinking न वापरता त्याने परंपरागत पठडीतूनच विचार करावा अन्यथा त्याला internal exam मध्ये कमी मार्क देण्यात येतात, त्याला वेगळं पाडलं जातं, टॉर्चर केलं जातं, इतर कोणत्याही activity मध्ये भाग घेण्यास अन्यायाला विरोध करण्याच्या भानगडीत त्याने पडता कामा नये अन्यथा त्याच्या करिअर वर दुष्परिणाम करणारे कृत्य शिक्षणव्यवस्थेकडून होण्याची भीती सतत वाढत आहे,

*ज्ञान मिळवण्यापेक्षा मार्क मिळवणे आज महत्वाचं मानलं जातंय*

इथं एक प्रकारचा दबाव कायम असतो, ही घुसमट प्रत्येक विद्यार्थ्याला सहन करावी लागत आहे तो आज मुक्त नाही, तो आज व्यक्त होऊ शकत नाही किंबहुना त्याला हवे तसे व्यक्त होऊ दिले जात नाही

*आज्ञाधारकतेच्या नावाखाली विचारस्वातंत्र्याचा बळी दिला जात आहे*

देशाचे भावी नागरिक या नात्याने त्यांना राजकीय मते व्यक्त करू दिली जात नाहीत जर कुणी केलीच तर त्याचा कन्हैया कुमार नाहीतर रोहित वेमुला केला जातो.

काही विद्यार्थी संघटना सत्ताधारी पक्षाचा अजेंडा त्यांच्या पाठिंब्याने विद्यापीठात व विद्यार्थ्यांवर थोपवत आहेत व त्याला विरोध करणाऱ्यांचं दडपशाहीच्या मार्गाने दमन केलं जात आहे. एकूणच हा आवाज दाबला जातोय सगळीकडेच..!

*”अभिव्यक्ती स्वातंत्र्याच सर्वात मोठ व्यासपीठ social media पण आता सुरक्षित राहिला नाही”* 

ट्रॉल करणारे पण आता टपून बसलेले असतात की उठणारा आवाज कसा दाबता येईल, धमकी आणि सामूहिक विरोध या माध्यमातून.!

व्यक्त होणाऱ्याला असे वाटले पाहिजे की एवढे सगळे लोक सामूहिक रीत्या आपल्याला विरोध करीत आहेत याचा अर्थ आपणच चुकलो वाटतं आणि त्याची स्वातंत्र विचार करण्याची क्षमता मारली जात आहे.

*”आता असे निर्भय व दडपण मुक्त कॅम्पस करण्यासाठी काय करावे लागेल ?”*

विद्यार्थ्यांच्यात उपजत असलेली चिकित्सक वृत्ती अजून प्रगल्भ कशी करता येईल आणि त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ते स्वतः शोधण्यास सक्षम कसे होतील या कडे लक्ष देण्याबरोबरच त्यांना समता स्वतंत्र बंधुता ही मुल्ये पण शिक्षणव्यवस्थेला अंगिकारावी लागतील.

ही जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्यांची असेल की ते कधीही स्वतःला हरलेले एकटं समजणार नाहीत,

अनेक विद्यार्थी सांगत होते जर ते एका दिवसासाठी धोरणकर्ते झाले तर आम्ही असं करू तसं करू, मग मला असं वाटत की या विद्यार्थ्यांच्या मताला धोरण निर्मितीमध्ये कुठेतरी जागा हवी ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा मते यांचा विचार प्रकर्षाने व्हायला हवा,

आज 35% पेक्षा अधिक विद्यार्थी भारताबाहेर migration करीत आहेत, बुद्धिसंपदेचा ओघ भारतातून परदेशात जात आहे ते थांबण्यासाठी या विद्यार्थ्यांना इथेच भारतात संधी कशी उपलब्ध करून देता येईल, तसेच पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच आजची शिक्षण व्यवस्था ‘प्रश्न विचारणारा निर्भय व नीतिमान विद्यार्थी’ निर्माण करू शकेल, 

मुक्त, स्वतंत्र, निर्भय आणि जबाबदार वातावरण निर्मिती हे विद्यार्थ्यांच्या संघटनातून आणि धोरणकर्त्यांच्या ईच्छा शक्तीमधून साध्य होण्यासारखे आहे.

– विनायक साळुंखे,

M.Sc. Environmental Science,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

– ७५८८१६७७२१

with best wishes,
vinayak shalan mahadev salunkhe,
ap-mirajwadi, tal-walwa, dist-sangli,(MH)india. pin-416301
mob- +91 – 7588167721
email- envinayak@gmail.com
blog- https://envinayak.wordpress.com
Facebook- vinayaksalunkhe21@gmail.com

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो,
वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो.

हॉस्टेल … तुमचं आणि आमचं ..!

*हॉस्टेल*

अनेकांच्या आयुष्यातील न विसरता येणारे दिवस हॉस्टेल च्या जीवनातील असतात,

अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पहिल्यांदा इथंच केलेल्या असतात, त्यामुळे त्या आठवणी खोल मनात कोरल्या गेल्या असतात.

त्या आठवणी आठवताना मी माझ्या नजरेत मला दिसलेलं हॉस्टेल हॉस्टेलच्याच बोली भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे. काही लोकांना ही हॉस्टेल ची भाषा कितपत सोसेल माहीत नाही. पण आपण तर enjoy करुया ही life हॉस्टेल ची..!

कोवळं ते वय असतं, उद्याच्या स्वप्नांचा तो संच असतो,

काही अनुभवी व काही नवखे यांचा तो मंच असतो
घरातून आणलेला खाऊ 

वाटून खायला पण शिकवतं

लपवून ठेवायला पण शिकवतं

होस्टेल life खरं जगायला शिकवतं
आमचा T-shirt आठवडा भर मळत नाही,

वाळत घातलेल्या पँटीची पायपुसनी झाली तरी कळत नाही,
सगळ्या क्रिडा सार्वजनिक ठिकाणीच कराव्या लागतात

त्याचं याचं सेम असतं तेच

बघुन डोळे निबर झाले असतात
मुतायला जरी चाललं तरी दोस्त संगट असतो

इथं प्रत्येकाचा बाप भितींवर रंगत असतो
त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा मरण दिन असतो,

केक कापल्यावर इतके मारतात की आठवडा भर तो इव्हळत असतो
पुढच्या 1 तारखेपर्यंत पॉकेट मनी पुरवायचा लोड असतो

इथे प्रत्येकाच्या वाळत घातलेल्या चड्डीला कलर कोड असतो
कुणाच्या वस्तुंचा कुणालाच ताळमेळ नसतो

दिसेल ती आपलीच असं म्हणून ढकलायचा वेळ असतो
आज झाडू कोण मारणार यावर एकीकडे खल सुरु असतो

तर दुसरीकडे

एक साबण महिनाभर कसा पुरेल यावर शोध सुरु असतो
तेलाची बाटली फटकन फुटली

म्हणून

शेजाऱ्याचं लावायला लाज नाही वाटली
आपला पाहुणा रूम मध्ये आला की तो मोका खास असतो

आणि तो खास मोका साधून पार्टनर ने सोडलेला वास असतो
जी घाबरट मुले पोरीना घाबरून पळतात

त्यांचे खरे रंग होस्टेल च्या बाथरूम मध्ये कळतात
दिवसा जिम ला जाऊन सलमान बनून फिरतात

रात्री अंधारात मुतायला चाललं की हळूच हाक मारतात
सकाळी उठून देवपूजा करणारं पोरगं लै गॉड दिसतं पण

त्याच्या मोबाईल मध्ये किती माल हाय हे समद्या तालुक्याला ठावं असतं
भरपूर मैत्रिणी असलेल्या पोरांचा आम्हाला असतो हेवा

तेवढ्यात कोणतरी पादतय म्हणतंय

‘आम्हाला पण कायतरी ठेवा ..!’
बघाल तेव्हा याचा टॉवेल सुटलेला

“या वेळी पोरी काय करत असतील रे.?”

हा प्रश्न त्याचा न सुटलेला
अभ्यासाचा विषय आला की तोंड हागाय जातंय

पोरींचा विषय निघाला की धुमशान अंगात येतंय
दिवसभर जी पोरं पोरींच्या पाठीमागे पळतात

तीच रात्री मोबाईल चार्जिंग साठी लाईटच्या बोर्डासंगे खेळतात
परीक्षा जवळ येईपर्यंत अभ्यास ध्यानीमनी नसतोच

ऐन परीक्षेत हैदोस पुरवणारा एक तरी चतुर असतोच
अभ्यास करू वाटला तरी मित्र करू देत नाहीत

अहो अभ्यासाचं सोडा

मरण जरी आलं तरी सुखाने मरू देत नाहीत
येड्यांची जत्रा म्हणा किंवा म्हणा खुळ्यांची यात्रा

प्रत्येक दुःखांवर इथेे मिळते मात्रा
लोळायला, रांगायला आणि चालायला पण शिकवतं होस्टेल,

पळायला, पडायला आणि पुन्हा उभं राहायला पण शिकवतं हॉस्टेल..!
इथे राहत असताना दिवस कसे जातात कळत नाहीत

नंतर कितीही मागितलं तरी ते दिवस पुन्हा मिळत नाहीत…!

©विनायक साळुंखे Vin$

7588167721